औरंगजेब
₹250.00 Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00.
- Book : औरंगजेब
- Authors :ऑड्री ट्रश्की
- Translator: सुदर्शन आठवले
- Pages: 162
-
Price :
₹250.00Original price was: ₹250.00.₹225.00Current price is: ₹225.00. - ISBN: 9788198585561
भारताच्या इतिहासातील सर्वांत तिरस्करणीय शासकाचे चरित्र
सहावा मोगल बादशाह औरंगजेब आलमगीर (राजवटीचा काळ १६५८ ते १७०७) याची भारतातील लोकांकडून सर्वांत जास्त निंदा केली जाते, त्याचा तिरस्कार केला जातो. हिंदूंचा द्वेष करणारा, खुनी आणि धर्मांध अशा शब्दांत त्याचे वर्णन केले जाते. विशेषतः ब्रिटीश राजवटीच्या काळातील विचारवंतांनी औरंगजेबविषयी ‘हिंदूंचा तिरस्कार करणारा धर्मवेडा मुस्लीम शासक’ असे जे मत पसरवले आहे तेच बहुसंख्य भारतीय धरून बसले आहेत. न्यायी, सत्पात्र शासक होण्यासाठी कसून प्रयत्न करणारा मोगल बादशाह अशीही एक बाजू औरंगजेबच्या चरित्रात आहे. वाचकांच्या मनाची पकड घेणाऱ्या या चरित्रात ऑड्री ट्रश्की यांनी वाचकांना औरंगजेब या वादग्रस्त मोगल बादशाहचे एका निराळ्या दृष्टीने दर्शन घडवले आहे आणि त्याच्याविषयीच्या सार्वजनिक वादात मोठ्या धाडसाने एक निराळे विरोधी मत मांडले आहे.
“अत्त्युत्तम… गुंतागुंतीच्या, वादग्रस्त ऐतिहासिक व्यक्तींची चरित्रे कशी लिहावीत? याचे उत्तम उदाहरण.”
द हिंदू
“ट्रश्की यांच्या लिखाणात बुद्धिचातुर्यही आहे आणि आवडीचा विषय असल्याने उत्साहही आहे.”
वॉल स्ट्रीट जर्नल
“ऑड्री ट्रश्की यांचे संशोधन औरंगजेबबद्दलचा तुमचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलेल.”
हिंदुस्तान टाईम्स
Jamirahamad Mushrif –
Good
Jamirahamad Mushrif –
Good enough
सुनिल लांडे –
#पुस्तक_परिचय
‘औरंगजेब व्यक्ती आणि मिथक’
फार पूर्वी ना. सं. इनामदार यांचे औरंगजेबावरील ‘शहेनशहा’ हे पुस्तक वाचले होते तेव्हाच औरंगजेब हा मोगल सम्राट ‘फक्त हिंदूविरोधी खलनायक’ या प्रतिमेच्या पलिकडेही बराच काही होता याची पहिल्यानेच जाणीव झाली होती. औरंगजेबाविषयी वस्तुनिष्ठ साहित्य उपलब्ध पुरेसे व सहज उपलब्ध नसल्याने फारसे वाचनात आले नव्हते. कदाचित मी स्वतः इतिहासाचा अभ्यासक नसून फक्त वाचक असल्याने व अशा साहित्याच्या सहज उपलब्धतेवर अवलंबून असल्याने असेल. पण एक गोष्ट निश्चित जाणवत होती की मोगल साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार औरंगजेबाच्याच काळात होता. एक कुशल प्रशासक, राजनिती तज्ञ असल्याशिवाय हे शक्य नव्हते. देवळे पाडून व धर्मांतरे करून प्रजेचा रोष ओढवून घेतला असता तर हे शक्य नव्हते. हिंदू विरुद्ध इस्लाम असा धार्मिक आधारावर सत्तासंघर्ष असता तर बहुसंख्य असलेली हिंदू प्रजा विरोधात गेली असती, हिंदू मिर्झाराजे जयसिंग हिंदू शिवाजी महाराजांवर जरब बसवण्यासाठी येणे शक्य नव्हते.
व्यक्तीपूजेची भारतीयांची मानसिकता पाहता औरंगजेबाच्या इतिहासाचे भारतात योग्य मूल्यमापन होईलच ही शक्यता कमी होते. अशा स्थितीत आपल्या इतिहासाशी भावनिक बंध नसणाऱ्या त्रयस्थ व तटस्थ संशोधकांकडून इतिहास समोर आल्यास तो वास्तवाच्या अधिक जवळचा असण्याच्या शक्यता वाढतात. अशाच त्रयस्थ व तटस्थ नजरेतून औरंगजेबचा इतिहास पाहण्याची संधी ‘औरंगजेब व्यक्ती आणि मिथक’ हे ऑड्री ट्रश्की यांनी लिहिलेल्या संशोधनपर पुस्तकातून मिळते. या पुस्तकात औरंगजेबाचे गुण व दोष दोन्ही मांडून त्याचे यथायोग्य मूल्यमापन केले आहे ते निश्चितच वाचनीय आहे.
मध्ययुगात स्पर्धक भावांचा काटा काढून सत्ता मिळवणे ही सामान्य गोष्ट असल्याने औरंगजेबाने वेगळे काही केले नव्हते. पण वडिलांना तुरुंगात डांबून सत्ता आपल्याकडे घेतल्याने मोगल साम्राज्याचे न्यायाधिश यांची नाराजी तर औरंगजेबाने ओढवून घेतली होतीच पण मक्केचे शरीफ यांनी त्याला हिंदुस्थानचा शासक म्हणून मान्यता दिली नाही. पर्शियाचा सफाविद घराण्यातील सम्राट सुलेमान यानेही जळजळीत निर्भत्सना केली. या सर्वांचा परिणाम म्हणून वडिलांना दिलेली अन्यायी वागणूक औरंगजेबाला आयुष्यभर टोचत राहिली आणि त्यातूनच त्याचे आपण कडवे धार्मिक असल्याचा देखावा त्याला उलेमांपुढे करावा लागत असे असे लेखिका सप्रमाण दाखवून देतात. या देखाव्याचा परिणाम म्हणून अकबराने बंद केलेला जिझिया कर शंभर वर्षांनंतर औरंगजेबने सुरू केला खरा पण त्यातील फारच थोडा भाग शाही खजिन्यापर्यंत पोहचत असे. पुढील काळात देवळांच्या जमिनी, संपत्ती, वतने जप्त करण्याचे आदेश काढले पण त्यांची अंमलबजावणी अजिबातच न केल्याने ते कागदावरच राहिले. या त्याच्या कृती फक्त उलेमांची मर्जी संपादन करण्यापुरत्याच होत्या.
त्याने पाडलेल्या देवळांची संख्या बारापेक्षा कमी असल्याचे सांगून हजारो देवळांना दान दिल्याचे, संरक्षण पुरवल्याचे मोगल इतिहासाचे जेष्ठ अभ्यासक रिचर्ड इटन सिद्ध करतात याकडेही या पुस्तकात लक्ष वेधले आहे. जी देवळे पाडली गेली ती मोठी व धनदांडगी असून ती औरंगजेबाच्या विरोधात मंदिर व्यवस्थापनाने कट कारस्थाने केल्याने पाडली गेली हे दाखवून ही प्रथा मोगलपूर्व हिंदू राजवटीतून सातव्या शतकापासून प्रचलित असल्याचेही लेखिका स्पष्ट करतात.
औरंगजेबाच्या राजवटीत धर्मांतरांना प्रोत्साहन दिल्याचेही आढळत नाही. उलट प्रशासकीय व्यवस्थेत अकबराच्या काळात २१.५ टक्के हिंदू होते ते प्रमाण औरंगजेबाच्या काळात ५०% वाढून ३१.६% झाले. उच्चपदस्थ हिंदू मनसबदारांची संख्या सुद्धा १००० पेक्षा जास्त होती. रजपूतांचा दारा शुकोहला पाठिंबा असला तरी मराठे औरंगजेबाच्या बाजूनेच असल्याचेही स्पष्ट केलेय.
औरंगजेब स्वतः सत्ताकारणाने कुटुंबाशी अन्यायाने वागला असला तरी सत्ता मिळाल्यावर प्रजेकरता न्यायी प्रशासनासाठी तो अतिशय आग्रही असून वेळप्रसंगी हिंदू प्रजेवर अन्याय होत असेल तर मुस्लीम अधिकाऱ्यांना शिक्षा पण केल्या आहेत याची अनेक उदाहरणे पुराव्यांसह दाखवून दिलेली आहेत.
या अत्यंत गुंतागुंतीचे व्यक्तिमत्व असणाऱ्या औरंगजेबाला खलनायक वा दुष्ट राज्यकर्ता म्हणून ओळख ब्रिटीश राजवटीत फोडा व झोडा या धोरणातून दिल्याची व तीच ओळख पुढे प्रस्थापित होऊन धार्मिक ध्रुवीकरणासाठी वेळोवेळी वापरली गेल्याची व सद्यकाळातही वापरली जात असल्याची मांडणी ऑड्री ट्रश्की या पुस्तकात करतात.
एकंदरीत हे पुस्तक आपले कुतूहल जागृत करून औरंगजेबाच्या प्रतिमेच्या पलिकडे पहायला प्रवृत्त करते. अर्थात प्रचलित समजुतीपलीकडचा इतिहास जाणून घ्यायची इच्छा असेल तरच. प्रचलित समजूतीतून बाहेर पडण्याची ज्यांची इच्छाच नाही त्यांचा प्रश्न नाही.
✍️ सुनिल लांडे
‘औरंगजेब व्यक्ती आणि मिथक’
लेखिका- ऑड्री ट्रश्की, अनुवाद- सुदर्शन आठवले
मधुश्री प्रकाशन
किंमत- ₹ २५०/-