वेंकटेशा
₹300.00 Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00.
- Book : वेंकटेशा
- Authors :अंजली दासखेडकर
- Pages: 272
-
Price :
₹300.00Original price was: ₹300.00.₹270.00Current price is: ₹270.00. - ISBN: 978-81-980859-3-1
प्रेम, विरह, ओढ, माया, काळजी, सुख-दुःख, करुणा, कर्तव्य आणि वचनपूर्ती ह्या भावभावना साक्षात नारायणालाही चुकल्या नाहीत. तो देखील ह्या भावना जगतो, अनुभवतो आणि निभावतो. परंतू जेव्हा तो निभावतो तेव्हा समस्त संसारासाठी तो एक आदर्श ठेवतो.
ही गोष्ट आहे अश्याच भावभावनांची, नात्यांची, प्रेमाची, प्रतिक्षेची…. वेंकटेशाची !
वाचा वेंकटेश अवताराची संपूर्ण कथा.
Availability: 973 in stock
4 reviews for वेंकटेशा
Add a review Cancel reply
Recently Viewed Books
You haven't viewed at any of the products yet.
pankaj Navarkar –
वेंकटेशा ही अंजली दासखेडकर लिखित सात खंडांमध्ये विभागलेली कादंबरी आहे. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग अशा चार युगांत घडणाऱ्या घटना या कथेत एकत्र गुंफलेल्या आहेत. कृष्ण जन्म, त्याचे बालपण, वेदवती आणि पद्मावती यांचे जीवन, वेंकटेश आणि पद्मावती यांची प्रेमकथा यांसारख्या घटनांना एका वेगळ्या दृष्टिकोनातून मांडले आहे. पौराणिक कथा असूनही यात एक नवीन भावनिक आणि आध्यात्मिक परिमाण आहे.
पुस्तक वाचताना सुरुवातीपासूनच त्याच्या शैलीत गुंतून राहण्यासारखे वाटते. कृष्णाच्या बालपणाच्या वर्णनांनी एक वेगळाच आनंद मिळतो, तर वेदवती आणि सीतेच्या घटनांनी मन भारावून जाते. वेगवेगळ्या पौराणिक पात्रांमध्ये दुवे जोडताना, कथानक कुठेही विस्कळीत होत नाही. प्रत्येक पात्राचे कथेत असलेले स्थान आणि त्याच्या भावना फार समर्पकपणे मांडल्या आहेत.
सोप्या भाषेत लिहिलेले असूनही लेखनात गूढता आणि भावनिक खोली आहे. पौराणिक संदर्भ अचूक आहेत आणि संशोधनाची छाप स्पष्टपणे जाणवते. वेंकटेश आणि पद्मावती यांची कथा विशेष उठून दिसते आणि त्यांच्या संवादांमधून गोडवा जाणवतो. पौराणिक पात्रांना अधिक मानवी स्वरूप देण्याचा प्रयत्न खूप प्रभावी आहे.
काही प्रसंग लांबलेले वाटू शकतात, त्यामुळे पुस्तक वाचताना संयम ठेवावा लागतो. तसेच, काही संवाद अधिक प्रभावी होऊ शकले असते, पण त्यामागील भावना मात्र स्पष्ट व्यक्त केल्या आहेत.
पौराणिक कथा आणि आध्यात्मिक आशय आवडणाऱ्या वाचकांसाठी हे पुस्तक एक वेगळा अनुभव देणारे आहे. पौराणिक साहित्याच्या प्रेमींनी हे नक्की वाचावे. हे केवळ कथा सांगणारे पुस्तक नाही, तर जीवनाचे आणि भक्तीचे नवे पैलू उलगडणारे साहित्य आहे.
Asha chahankar –
तिरूपती बालाजी अवताराचे रहस्य आणि त्यातील व्यक्तिरेखा उलगडणारी मराठीतील पहिली व एकमेव कादंबरी.
ही कादंबरी आपल्याला चारही युगांचा प्रवास घडवून आणते. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, आणि कलियुग ह्या सर्व युगांमधून प्रवास करत आपण वेंकटेश अवतारातील भगवंताच्या जीवनाचा आढावा घेतो.
यशोदा, वेदवती, वराहस्वामी ह्यांचा वेंकटेशा अवताराशी असलेला धागा ही पौराणिक कादंबरी उलघडा करते.
वेंकटेशा आणि पद्मावती ह्यांची प्रेम कथा वाचायला मिळते.
पौराणिक कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर तुम्ही हे पुस्तक वाचायलाच हवं.
Neha Mhatre –
लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी वाचावी अशी ही कादंबरी आहे, कारण ती प्रत्येक पिढीच्या वाचकांना काही ना काही शिकवते, विचार करायला भाग पाडते आणि एक वेगळाच आध्यात्मिक आनंद देते. त्यामुळे पौराणिक कथा, भक्ती, प्रेम आणि जीवनाच्या गूढतेत रस असणाऱ्या प्रत्येकाने वेंकटेशची ही कादंबरी नक्कीच वाचावी!
Omkar Bagal (Bookbandhu Reviews) –
वेंकटेशा – अंजली दासखेडकर
पुस्तक परीक्षण – ओंकार बागल
प्रकाशन – मधुश्री प्रकाशन
पृष्ठ संख्या – २७० पाने
वेंकटेशा..वेंकटेशा सर्वांच्या इच्छा पूर्ण करो…अशा शब्दांनी शेवट झालेली ही कादंबरी. असं म्हणतात प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण असतं. कोणतीही गोष्ट अकारण घडत नसते, त्यामागे एक ना अनेक पैलू दडलेले असतात किंवा एखादी साखळी पूर्ण होण्यासाठी एका मागून एक अशा घटना घडत असतात. अगदी वैज्ञानिक संकल्पनेतून सांगायचं तर माणसाचं जीवनचक्र आणि त्याची साखळी असते तसं. संपूर्ण कहाणी कुणालाच माहित नसते, जो तो आपापल्या अनुभवांना प्रमाण मानून जगत असतो.
दुसऱ्या एका वैज्ञानिक परिभाषेतून सांगायचं झालं तर मानवी उत्क्रांती घ्या. त्या अनुषंगाने सतयुगापासून ते कलियुगापर्यंत चालू असलेली मानवाची वाटचालदेखील एका पद्धतीने उत्क्रांतीच म्हणता येईल. मानवाच्या अध्यात्मिकतेची उत्क्रांती… त्यासोबत मानसिकतेची, विचारसरणीची, तार्किकतेची आणि अंतरंगाचीदेखील. मनुष्याच्या व्यक्तिगत जडणघडणानंतर समाजकारण, राजकारण आणि राष्ट्रकारण हेही तितकेच महत्वाचे. कारण या गोष्टींना बाजूला सारून जगणं कुठल्याच मनुष्याच्या भाळी नसतं, मग स्वतः ईश्वर मानवी रूपात प्रकट झाले तरी त्यांनाही याखेरीज गत्यंतर नाही.
ज्या ठिकाणी मानव आहे त्याठिकाणी त्याच्या गरजा, इच्छा, आकांक्षा, समस्या, भावना, चेतना या गोष्टी ओघाने येणारचं. या गोष्टी त्याला नेहमीच बुचकळ्यात टाकत असतात. काय करावे? काय करू नये? चांगले काय? वाईट काय? इथपासून ते धर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे काय? आणि कर्तव्य म्हणजे काय? इथपर्यंत. मानवाची बुद्धी नेहमीच प्रगल्भ होत राहील; परंतू परिपूर्ण कधीच होऊ शकणार नाही. तरीही मनुष्य कधीच स्वस्थ बसणार नाही. कदाचित याची जाण केवळ विधात्यालाच असावी. त्यामुळे त्याने वेळोवेळी साक्षात मनुष्याचा अवतार घेऊन त्याला योग्य वाट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बाकी अवतार, ईश्वर या संकल्पना ज्याच्या त्याच्या मानण्यावर.
सांगण्याचा मुद्दा इतकाच की ईश्वराने या पृथ्वीतलावर अनेक अवतार घेतले. प्रत्येक अवतार घेण्यामागे त्याचे विशिष्ट प्रयोजन राहिले आहे. रामायण आणि महाभारत हे दोन्ही भारताचे अतिशय लोकप्रिय महाकाव्य आहेत, त्याद्वारे कृष्ण आणि राम सर्वांपर्यंत पोहोचले. मात्र बाकी इतर अवतार आणि त्यांच्या कथा अजूनही कित्येकांना माहित नाहीत. म्हटलं तर हा भारताचा युगायुगपासूनचा इतिहास आहे. अगदी काहीच नाही तर महाकाव्य या प्रमाणातूनसुद्धा या कथांची आणि प्राचीनतेची ख्याती सातासमुद्रापार प्रसिद्ध आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन ही कादंबरी वाचकांसमोर सादर करण्यात आली आहे. ‘वेंकटेशा’ या कादंबरीतून अंजली दासखेडकर यांनी अशाच एका नारायण अवताराची, तिरुपती बालाजी अवताराची संपूर्ण कहाणी चितारली आहे.
तिरुपतीस्थित बालाजी अवतार, त्याला जोडून असणाऱ्या इतर गोष्टी, संबंधित कथा, कहाण्या आणि त्यामागील कारणे, अशा बऱ्याच गोष्टी बारकाव्यानिशी या कादंबरीतून वाचायला मिळतात. लोकांपर्यंत आणि मराठी वाचकांपर्यंत ही कहाणी कादंबरीस्वरूप पोहोचली ही सर्वप्रथम उल्लेखनीय बाब. काही कहाण्या, ज्या बोलीस्वरुपातून, मौखिक स्वरूपातून प्रचलित असतात त्या इतिहासाच्या कालौघात हरवून जातात. पुराणकथांच्या बाबतीत ही स्वाभाविक होणारी गोष्ट असल्याने ती लिखित आणि अतिशय सुंदर कादंबरीद्वारे वाचकांसमोर प्रस्तूत झाली, हे उत्तम झाले. या कादंबरीत क्रमानुसार विविध युगातील अवतारांबद्दल सखोल विवेचन करण्यात आलेले आहे. कृष्ण जन्मापासून ते देवकी आणि यशोदेच्या मातृत्वापर्यंत. गोकुळातील बलरामाच्या बंधुप्रेमापासून ते मथुरेतील कर्तव्याच्या पालनापर्यंत आणि प्रत्येक युगाच्या शेवटी, नव्या युगाच्या प्रारंभासाठी केलेल्या अंतापर्यंत या कादंबरीतून ठाव घेता येतो.
अध्यात्मिकतेची आवड असणाऱ्यांना तर ही कादंबरी आवडेलच आवडेल. शिवाय कोणत्याही वाचकाला माहितीपर आणि गोष्टीस्वरूप वाचायला केव्हाही उत्तम. अगदी लहान मुलांना गोडी लावण्यासाठी ही कादंबरी नेहमीच एक छान पर्याय असेल. या कादंबरीला केवळ अध्यात्म आणि पुराणकथेवर आधारित असणारी कादंबरी इथपर्यंत मर्यादित ठेवणे, कधीच योग्य होणार नाही. कोणत्याही पुराणकथा त्यातील काही सबबींमुळे भाकड वाटत असल्या तरी त्यातील प्रमाण आणि तार्किकता कधीही कमी होत नाही. ही कादंबरीदेखील त्याच अनुषंगाने खूप सुरेख रचली आहे. बालकृष्ण, राम अवतार, देवी सीता, वराहस्वामी, वेदवती, पद्मावती, वेंकटेश, बकुळा या पात्रांद्वारे अनेक गोष्टींचा यातून खुलासा करण्यात आलेला आहे.
संपूर्ण कादंबरीत विविध युगांतील जे धागेदोरे आहेत ते अतिशय वैशिष्ट्यपूर्ण गुंफलेले आहेत. अर्थात भावनिक साद, ही त्यामागची खरी धारणा असल्याची प्रचिती प्रत्येक वेळी आणि प्रत्येक युगाच्या शेवटाला येत राहिली आहे, हेच अंतिम सत्य. राम, सीता यांच्याशी एकरूप झालेलं, इतिहासात विरून गेलेलं, अन्नभिन्न राहिलेलं एक पात्र म्हणजे ‘वेदवती’. या पात्राबद्दल कादंबरीतून बराचसा उलगडा होतो. रामायणातील कित्येक महत्वाच्या घटनांवरदेखील याद्वारे प्रकाश टाकण्यात आला आहे. शेवटी तिरुपती हेच निवासस्थान का? त्या ठिकाणाला आणखी काय महत्व आहे? वेंकटेश तिकडे का आणि कसे पोहोचतात? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तिथे कायम वास्तव्य का करतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे यातून वाचायला मिळतात.
भारताच्या प्राचीन काळापासून मातृत्व आणि स्त्रीत्वाला असलेलं अनन्यसाधारण महत्त्व या कादंबरीतून प्रकर्षाने जाणवत राहतात. कर्म, कर्तव्य आणि भावना एकसुरात वाहत ठेवण्याची परंपरा वाचकाच्या मनात साठून राहील. बकुळा आणि वेंकटेश यांच्या संवादातून बौद्धिक द्वंद, मनातील रितेपणा आणि मानवी जन्मातील अडसर हळुवारपणे कमी झाल्यासारखे वाटतील. मुळात कोणताही अवतार ही संकल्पना मानवाला त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगण्यासाठीच आहे, हे लक्षात येत राहील. आणखी एक सुंदर गोष्ट म्हणजे कादंबरीच्या शेवटी असलेला वेंकटेश आणि पद्मावतीचा विवाहसोहळा. या सोहळ्याचे वर्णन इतक्या भन्नाट पद्धतीने लिहिले आहे जणू वाचणारा ते प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवत असल्यासारखे वाटते.
चारही युगांचा विलक्षण प्रवास करून आणणारी ही कादंबरी. कृष्ण, बलराम, यशोदा, देवकी, नंदबाबा, कंस, राम, सीता, रावण, कुंभकर्ण, इंद्रजीत, हनुमान, ब्रह्मदेव, वराहस्वामी, वेदवती, पद्मावती, बकुळा, वेंकटेश अशा पात्रांनी भरलेल्या कादंबरीचा अनुभव अतिशय आल्हाददायक आणि भावनाप्रधान आहे. प्रेम, विरह, भावना, नाते, कर्म, कर्तव्य, बंधने, वचनपूर्ती, भावनिक साद, माया, ममता, करूणा, दुःख, विरह, वेदना अशा सर्व पाशांचा याद्वारे उलगडा होत राहील. हे लिखाण साध्या, सोप्या शब्दांत, वाचकांना रुचेल अशा स्वरूपात आहे. कित्येक ठिकाणी अगदी अवघड, बोजड लिहिणं टाळून रसाळ शब्दांत विवरण केले गेले आहे. पुराण कथांतील संदर्भ व त्यातील मतितार्थदेखील तर्कशुध्द आहे.
प्रत्येक युगातील अवताराची, प्रेमाच्या भावनिकतेची आणि वेंकटेशाच्या प्रकट होण्याची ही कहाणी मानवाला अनेक उच्चतम जीवनमूल्ये शिकवून जाते. माणसाला मानवी देहात जगताना लागणारी सारी रीत सांगून जाते. ‘वेंकटेशा’ या कादंबरीतून वाचकाला मिळणारा आनंद अगदी निराळा आहे. अतिशय मधाळ आणि विविधांगी पैलूंनी परिपूर्ण अशी ही कादंबरी तिच्या सर्व पानांवर वाचकाला खिळवून टाकणारी आहे. शेवटी एकच म्हणावसं वाटेल, “वेंकटेश सर्वांच्या इच्छा पूर्ण करो.”
-©ओंकार दिलीप बागल
9321409890
bookbandhureviews@gmail.com
Insta ID – bookbandhu_reviews