बळी
₹350 Original price was: ₹350.₹315Current price is: ₹315.
- Book : बळी
- Authors :अंजली दासखेडकर
- Pages: 344
-
Price :
₹350Original price was: ₹350.₹315Current price is: ₹315. - ISBN: 9788199140332
बळी म्हणजे केवळ चक्रवर्ती सम्राट नव्हे, तर त्रैलोक्यावर अधिराज्य गाजवलेला आणि प्रजेने काळजात चिरकाळ जपून ठेवलेला चिरंजीवी राजा! न्याय, प्रेम आणि समृद्धीने त्रैलोक्य उजळून टाकणारा दानवीर ! महाबली बळी राजा नेमका कोण होता? दानशीलतेचे सर्वोच्च शिखर गाठणारा बळी राजा नेमका कसा होता ? युद्धात त्याचा पराक्रम विजेसारखा झळाळत होता.. सभेत त्याचा विचार समुद्रासारखा खोल होता.. आणि त्याचे प्रजेवरचे प्रेम वसंतासारखे बहरलेले होते. परंतु त्याच्या ह्या भव्यतेच्या आड दडले होते; संघर्ष, विश्वासघात आणि नियतीचे खेळ. बळी राजाचे हृदय जितके विशाल होते, तितकेच हळवेही होते. प्रेम, मैत्री, नातेसंबंध ह्यांच्यात संतुलन राखणारा हा राजा शेवटी कोणत्या निर्णायक क्षणी नियतीसमोर नतमस्तक झाला ? आजही ‘इडा पीडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे!’ असे आपण म्हणतो, ते बळीचे राज्य नेमके कसे होते ? बळीच्या राज्याच्या अद्वितीय काळाचे जिवंत दर्शन ह्या कादंबरीतून सर्वांना अनुभवायला मिळते.




Omkar Bagal (Bookbandhu Reviews) –
बळी – अंजली दासखेडकर
पुस्तक परीक्षण – ओंकार बागल
प्रकाशन – मधुश्री प्रकाशन
पृष्ठ संख्या – ३४३ पाने
‘बळी’ ही कादंबरी घरपोच मिळवण्यासाठी –
Madhushree Publication Link 👉
https://madhushreepublication.com/product/bali-anjali-daskhedkar/
Amazon Link 👉
https://amzn.in/d/gNQBsog
____________________________________
कित्येक शतके उलटून गेली तरी आजही बळी राजाबद्दल लोकांच्या मनात प्रेम आणि आदराचे स्थान कायम आहे. चिरंजीवी राजा महाबली बळी…ते केवळ चक्रवर्ती सम्राट नव्हते तर, न्याय, प्रेम आणि समृद्धीने आपले राज्य भरभराटीस आणणारे दानवीरदेखील होते. दैत्य कुळातील, भक्त प्रल्हाद यांचे नातू आणि राजा विरोचनाचे पुत्र. त्यांचे चारित्र्य अतिशय नैतिक आणि न्यायप्रिय होते. त्यांच्या दानशीलतेचे सर्वोच्च शिखर म्हणजे जेव्हा भगवान विष्णूंनी वामन रूपात येऊन त्यांच्याकडे तीन पावले जमीन मागितली. या घटनेमुळे त्यांना आपले राज्य गमवावे लागले, मात्र त्यांनी आपल्या वचनाचा संपूर्ण जगाला आदर्श घालून दिला.
अशा या महान बळी राजाचे समृद्ध ‘बळीचे राज्य’ वाचकांसमोर जिवंत साकारण्याच्या हेतूने लेखिका अंजली दासखेडकर यांनी ‘बळी’ ही कादंबरी लिहिली आहे. ‘इडा पीडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे’ असे गोडवे गायले जाणाऱ्या बळी राजाच्या जीवनाची ही कहाणी आहे. अनेक वर्षांपासून लोकांनी आपल्या काळजात जपून ठेवलेला हा बळीराजा नेमका कसा होता, त्याचे राज्य कसे होते, तिन्ही लोकांचा अधिपती असूनही, त्याला नियतीसमोर का झुकावे लागले, या प्रश्नांची उत्तरे ही कादंबरी शोधते.
लेखिकेने प्रल्हाद, विरोचन, शुक्राचार्य, विंध्यवल्ली, बळी या पात्रांना नेहमीच्या पारंपरिक चौकटीतून बाहेर काढून, त्यांच्यातील मानवी भावना रेखाटली आहे. बळी राजाच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या या महत्त्वाच्या पात्रांना लेखिकेने अतिशय बारकाईने मूर्त स्वरूप दिले आहे. अर्थातच, बळी राजाची गोष्ट यांच्याशिवाय तडीस जाऊ शकत नाही, या जाणिवेतून लेखिकेने सर्व पात्रांना उत्तम न्याय दिला आहे. प्रल्हाद हे बळी राजाचे आजोबा आणि दैत्य कुळाचे असूनही, ते भगवान विष्णूंचे परमभक्त होते. त्यांनी आपल्या नातवाला दिलेले संस्कार हे बळीच्या स्वभाव-गुणांत प्रकर्षाने दिसून येतात.
राजा विरोचन हे बळीचे वडील असून, ते बळीच्या आयुष्यातील पराक्रम आणि त्यागाचा धागा दर्शवतात. शुक्राचार्य हे असुरांचे कुलगुरू असून, त्यांनी प्रल्हाद, विरोचन आणि बळीच्या राज्यकारभारात मार्गदर्शक आणि राजकीय सल्लागार म्हणून भूमिका बजावली. विंध्यवल्ली ही बळी राजाची पत्नी असून, बळीच्या महानतेच्या मागे तिची शांत आणि संयमी साथ होती. तिच्या पात्रातून लेखिकेने स्त्रीशक्तीचे आणि भावनिक समजूतदारपणाचे दर्शन घडवले आहे. आपण नेहमीच दैत्य, दानव, असुरांना नकारात्मकतेच्या नजरेतून पाहत आलोय, मात्र ही कादंबरी वाचकाला वेगळ्या आणि नाण्याच्या दुसऱ्या बाजूने विचार करायला लावते.
विश्वाची निर्मिती, जीवांची उत्पती, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूची कहाणी, विष्णूंचे अवतार, ब्रह्म- विष्णू-महेश यांच्या कथा, गुरुकुलातील पद्धती, देव आणि दैत्यांचे मूळ वंशज, त्यांचे नातेसंबंध, एकमेकांसोबत सततची चालत असलेली युद्धे, इतर सूर-असुरांचे प्रसंग, समुद्रमंथन इ. अशा कित्येक गोष्टींनी ही कादंबरी परिपूर्ण आहे. त्या काळातील कला, सौंदर्य, परंपरा, चालीरीती, वास्तुशास्त्र आणि पद्धती यांचे संदर्भ कादंबरीला आणखी सुबक बनवतात.
लेखिकेने बळीच्या राज्याचे वर्णन करताना, त्यांच्या आदर्शांची जिवंत प्रतिमा वाचकांच्या मनात कोरली आहे. बळी राजाची ख्याती, प्रजाहितदक्ष राजा म्हणून सर्वत्र पसरली होती. त्याने आपले राज्य प्रजेच्या सुखासाठी समर्पित केले होते. त्याच्या राज्यात शेतकरी सुखी व संपन्न होते. त्याने कृषी क्षेत्रात अनेक संरचनात्मक बदल घडवून आणले. बळीराजाच्या काळात लोकांना शोषण विरहीत समाजरचना दिसून आली. त्यामुळे कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बळीच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘बलिप्रतिपदा’ म्हणून साजरा केला जातो.
एखाद्याच्या मनात निर्माण झालेला ‘अहं’ भाव नियती कशाप्रकारे तोडू शकते, हेदेखील विचारात घेण्यासारखे आहे. भगवान विष्णू तिन्ही लोकांचे पालक आहेत. जेव्हा जेव्हा या लोकांतील शक्ती विस्कळीत होते तेव्हा ते पुन्हा संतुलित करणे हे त्यांचे काम आहे. त्यानुसार बळीला सुथला येथे पाठवून, विष्णूंनी वामन अवतारात त्यांची लीला घडवून आणली. ही कादंबरी पौराणिक कथेचे पुनर्लेखन करत नाही, तर ती नियती आणि कर्मयोग यांच्यातील संघर्षसुद्धा दाखवते.
या कादंबरीच्या माध्यमातून सत्ता आणि वैराग्य, मोह आणि त्याग यांचे द्वंद्वही दिसून येते, उदा. बळी राजा त्रैलोक्याचा सम्राट असूनही, त्याने क्षणार्धात ते सर्व दान करण्याचा निर्णय घेतला. तर, प्रल्हादाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणारे शुक्राचार्य नंतर प्रल्हाद, विरोचन, बळीचे गुरु बनले. ही कादंबरी ‘दान’ या शब्दाचा अर्थ भौतिक वस्तू देण्या-घेण्यापुरता मर्यादित ठेवत नाही, तर त्याला एका तात्विक उंचीवर नेते. बळीचे दान हे ‘सर्वात्म-समर्पण’ होते, हे विचारत घेण्यासारखे आहे. शिवाय प्रचलित कथांमध्ये बळी राजाची कथा, वामन अवताराच्या दृष्टिकोनातून सांगितली जाते, जिथे बळी प्रतिनायक असतो. मात्र, या कादंबरीतून बळीला नायकाच्या भावनेतून व्यक्त केले आहे.
याखेरीज, मला कादंबरीचा वेग उत्तम वाटला. यातील कथानक मौलिक आणि ताजे आहे. अप्रतिम वातावरण निर्मिती, दमदार पात्ररचना आणि हृदयाला भिडणारी लेखनशैली यांमुळे कादंबरी वाचताना वेळेचे भान राहत नाही. ही कादंबरी वाचताना, वाचकाला प्रत्यक्ष त्या युगात प्रवास केल्याची अनुभूती येते. लेखिकेने कथानकात भावनिक प्रसंगाचा प्रभावी वापर केल्याने कादंबरी अधिक आकर्षक वाटते. संवाद आणि वर्णने वाचकाला अक्षरशः विस्मयचकित करून सोडतात. कादंबरीची भाषा नैसर्गिक आणि मनात सहज उतरणारी आहे.
काही ठिकाणी कथानकाला थ्रिलर सारखा अनुभव येऊन, कथेला समकालीन रंग मिळतो. मात्र कथेच्या शेवटचा, विष्णूंचा वामनरूपी अवतार, शुक्राचार्यांची तळमळ, विंध्यवल्लीची घालमेल आणि राजा बळीचे अंतिम त्याग दर्शवणारा प्रसंग डोळ्यांत पाणी आणणारा होता. बळी राजाला दिलेले चिरंजीवी वरदान त्यायोगे काहीसे सुखावणारे वाटले. संपता संपता ही कादंबरी आणि त्यांतील सारी पात्रे अंतर्मनाला स्पर्श करून गेली, हेही तितकेच खरे.
‘बळी’ कादंबरी वाचकांना बळी राजाच्या भव्यतेच्या आणि हळव्या मनाच्या जवळ घेऊन जाते. ही एका उत्तुंग आणि नैतिक मूल्ये जपणाऱ्या एका आदर्श राजाची कहाणी आहे. ‘बळी’ कादंबरी वाचकांना भूतकाळातील एका सुवर्णयुगाचे दर्शन घडून आणते. विशेषतः पौराणिक कथा, ऐतिहासिक व्यक्तिरेखा आणि मानवी मूल्यांचे बीज रुजवणाऱ्या साहित्यात रस असणाऱ्यांसाठी ही कादंबरी अत्यंत प्रेरक आणि ऊर्जा प्रदान करणारी आहे.
-©ओंकार दिलीप बागल
9321409890
bookbandhureviews@gmail.com
Insta ID – bookbandhu_reviews